श्रीगोंदा (प्रतिनिधी) - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सागर दयानंद शेळके यांनी प्रशासकीय दिरंगाईविरुद्ध पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. पंचायत समिती श्रीगोंदा येथील विस्तार अधिकारी पोपट एस. यादव यांच्यावर शासकीय कामात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास, ७ जुलै रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाबाहेर 'थाळी बजाओ आंदोलन' करण्याचा इशारा शेळके यांनी दिला होता. या तीव्र इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आणि आंदोलनाच्या अवघ्या एक दिवस आधी प्रशासनाने नमते घेत दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे अंतिम आदेश जारी केले आहेत.
अवश्य वाचा - महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय
काय आहे नेमके प्रकरण?
विस्तार अधिकारी पोपट शाहजी यादव (तत्कालीन ग्रामसेवक, हिंगणी दुमाला, ता. श्रीगोंदा) यांनी शासकीय कामात गैरवर्तन करणे, मालमत्ता संरक्षणाची जबाबदारी न पाळणे आणि कामात अक्षम्य विलंब केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दोषारोप सिद्ध होऊनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई केली जात नव्हती. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरुद्ध सागर शेळके यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दाराबाहेर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने व सामान्य प्रशासन विभागाने तातडीने सूत्रे हलवली. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ यांनी स्वतः अधिकृत पत्र काढून सागर शेळके यांना प्रशासनाने केलेल्या अंतिम कारवाईची माहिती दिली व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
हे वाचा - अहिल्यानगर जिल्ह्यात २१ जून रोजी नीट पुनर्परीक्षा; प्रशासनाची जय्यत तयारी
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (०२) अन्वये पोपट शाहजी यादव यांची पुढील एक वर्षासाठी एक वेतनवाढ (भविष्यातील वेतनवाढीवर परिणाम न होणाऱ्या स्वरूपात) रोखण्यात आली आहे.
तसेच यादव यांनी शासकीय कामात केलेल्या विलंबा बद्दल आणि अनियमीततेबद्दल त्यांच्यावर अंतिम रित्या 'ठपका ठेवण्यात' आला असून, तशी जाहीर नोंद त्यांच्या सेवापुस्तकात (Service Book) घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने आंदोलनाच्या तोंडावर तडकाफडकी कारवाई केल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचा सूर आहे. सागर शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आक्रमक भूमिकेला हे यश आले असून, "भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेला हा एक मोठा चपराक आहे," अशी प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे. प्रशासनाने मागण्या पूर्णपणे मान्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेरील 'थाळी बजाओ आंदोलन' तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा